Friday 2 January 2015

जय रौद्र शंभो

इथेच घात झाला … माझा शंभु राजा गनिमांच्या तावडित सापडला
संगमेश्वर -
इ.स. १६८९च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. .
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
संभाजी महाराजाना पुढील शिक्षा होती जबान काटायची. औरंगजेबाची तशी आज्ञा होती. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. अरे कसा उघडेल वाघाचा जबडा आहे, शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसविली गेली. त्या पकडीत त्यांची जीभ पकडली गेली, व तलवारीच्या वाराने ती कापली गेली.
ही हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.
-- जय रौद्र शंभो--
भीमा इंद्रायणी तिरी
वढु-तुळा संगामावरी
म्रुत्यंजय संभाजी पाहुनं
म्रुत्युही थिजला..
बाळ इथे निजला शिवाचा
बाळ इथे निजला...ll

No comments:

Post a Comment