Friday 2 January 2015

किल्ले प्रतापगड

किल्ले प्रतापगड
प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांनी झाकोळले __
जावली म्हणजेच जयवल्ली. 'येता जावली जाता गोवळी' म्हणून मिरवली गेलेली चंद्रराव उपाधी धारण करणार्‍या मोर्‍यांची राजधानी. शिवरायांनी ज्याचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना मानली जाते. याच गडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करून शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार केला. अशा या छत्रपतींच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणार्‍या प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांच्या जाळ्यात झाकोळले आहे.
दरवर्षी लाखोंच्या सख्येने पर्यटक व शालेय सहली प्रतापगडला भेट देतात. गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. अवघे चार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी चार तास लागतात. वाडा-कुंभरोशी ते प्रतापगड हा रस्ता १९५७ मध्ये बनविण्यात आला होता. त्यावेळी आतासारखी वाहतूक नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. रस्ता रुंदीकरणाची गरज आहे. यासाठी २०१३ मध्ये ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप कामास सुरुवात नाही.
प्रतापगडावर १६६१ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राज्याभिषेकापूर्वी शिवराय भवानीच्या दर्शनासाठी आले. १९ मे १६७४ रोजी त्यांनी ५६ हजारांचे सुवर्णछत्र अर्पण केले होते. किल्ल्यावर पश्‍चिम भागात कडेलोट पाईंट आहे. तेथून रायगड जिल्ह्यातील खेडी दिसतात. ध्वजा बुरुज, तलावाचा बुरुज, अफजल खान बुरुज, रेडका बुरुज,, यशवंत बुरुज, केदारेश्‍वर मंदिर, हनुमान मंदिर, चोरवाटा, दरबारी जागा, पाण्याची तळी हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
प्रतापगडावर डागडुजी करण्यासाठी शासनाकडून १२ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे बांधकाम चार टप्प्यांत पूर्ण करावयाचे आहे. डागडुजी करण्याचे काम बांधकाम विभागाकडे आहे. यांच्याकडून देण्यात आलेल्या ठेकेदाराने दोन वर्षांत २५ टक्क्यांपेक्षाही कमी काम केले आहे. बांधकाम विभागाने योग्य ठेकेदार दिला नाही, अशी नाराजी शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
बांधकामात चुन्याचा वापर करायचा आहे. मात्र, कारागीर नसल्याने हे बांधकाम बंद पडले आहे. कर्नाटक व गुलबर्गा या भागातील माहीतगार कुशल कारागीरच हे काम करू शकतात. गडाचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्यामुळे ध्वजा बुरुजाकडे जाताना पर्यटकांना मोठय़ा दगडांचे अडथळे पार करून पुढे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
किल्ल्याला एकूण ४५० पायर्‍या आहेत. भवानी मातेच्या मंदिराच्या परिसरातून शिवरायांच्या पुतळ्याकडे जाताना या पायर्‍या निसटलेल्या अवस्थेत असल्यामुळे पडण्याची शक्यता आहे. पूर्वीप्रमाणेच काळ्या दगडाच्या पायर्‍या असाव्यात, अशी मागणी होत आहे. किल्ल्याच्या परिसरात वीजवाहिन्या सर्वत्र झाल्यामुळे किल्ल्याचे निसर्गसौंदर्य झाकोळले आहे. वीजवाहिन्या जमिनीतून न्याव्यात, अशीही मागणी होत आहे.
प्रतापगड हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून येथे नेहमीच विद्यार्थी, पर्यटकांची गर्दी असते. वाहनतळापासून शिवरायांच्या पुतळ्यापर्यंतच्या अंतरात एकच शौचालय आहे. याकडेही देणे गरजेचे असल्याचे पर्यटक, शिवप्रेमींमधून बोलले जात आहे. गडाच्या पायथ्याला असलेल्या वाहनतळावर शंभर ते दीडशे वाहने उभी राहू शकतात. मात्र, पर्यटकांचा हंगाम असेल त्यावेळी गडावर तीनशे ते चारशे वाहने दाखल होतात. त्यावेळी मोठी अडचण निर्माण होते. वाहनतळाची जागा ही वनविभागाकडे असल्याने येथे वाहन तळ वाढविण्यास जागा मिळत नाही.
■ प्रतापगडावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १९५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्यात आला.
■ त्यानंतर वनविभागाने पुतळा परिसरात बागबगीचा तयार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment