Tuesday 25 March 2014

प्रति तानाजी, प्रति बाजिप्रभू



सरसेनापती नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी म्हणत असत हे सर्वांना माहीत आहे परंतू प्रति तानाजी आणि प्रति बाजिप्रभू फारसे कोणाला माहीत नाहीत म्हणून हा खटाटोप!

तानाजी मालूसरे यांनी रात्रीच्या अंधारात कडा चढून जाऊन किल्ले सिंहगड सर केला होता त्याचप्रमाणे कानोजी (का कान्होजी) यांनी किल्ले पन्हाळा सर केला होता. आनंदराव मकाजी आणि कानोजी हे दोघे पन्हाळा सर करावयाला गेले होते. सिद्दी जोहर ला पन्हाळा द्यावा लागला हे शल्य शिवरायांना सारखे सलत होते! त्यामूळे ही मोहीम हाती घेण्यात आली होती. आधी ठरल्याप्रमाणे कानोजीने कडा चढून जायाचे आणि आनंदराव मकाजी यांनी खालून ह्ल्ला चढवायचा व गड सर करायचा असा बेत ठरला होता. परंतू कानोजी ने ती वेळच येऊ दिली नाहि. फक्त ६० लोकांना घेऊन कानोजी कडा चढून वर गेले, आणि किल्ल्यावर चहूकडे पसरले, चहुबाजूने एकदम कर्णे वाजवून त्यांनी "हर हर महादेव" अशी गर्जना करून एकच हल्ला बोल केला. गडावर त्यावेळी जवळ जवळ १५०० अदिलशाही शिबंन्दी होती. परंतू ते इतके गोंधळून गेले की फक्त ६० लोकांना ते सरळ शरण आले! ६० मावळ्यातील एकही मावळा दगावला नाही! ६० लोकांनी १५०० च्या फौजेचा पराभव केला!

बाजिप्रभूंनी ज्याप्रमाणे ३/४ तास पावनखिंड अडवून ठेवली होती त्याप्रमाणे रामजी पांगारा यांनी चांभारगडाजवळ दिलेरखानाला अडवून ठेवले होते! प्रतापराव गुजर आणि मोरोपंत साल्हेर गडाला वेढा घालून बसले होते. साल्हेर हा बागलाणातील अत्यंत महत्वाचा किल्ला होता. मोठी फौज वेढा घालून बसली होती, दिलेरखानाला ही गोष्ट कळल्यावर तो बर्हाणपूर हून मोठी फौज घेऊन वेढा मोडून काढण्यासाठी निघाला. वाटेत त्याला दुसरा मुरारबाजी भेटला! रामजी पांगारा तेंव्हा चांभारगडाचे किल्लेदार होते, गडावरील ६०० मावळे दिलेरखानाला अडवायला गडाजवळील खिंडीत दबा धरून बसले! दिलेरखानाला त्यांनी तसूभरही पूढे सरकू दिले नाही! सर्व ६०० मावळे कामी आले!