Friday 2 January 2015

शिवछत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ

* शिवछत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ *
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवरायांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक स्वराज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. शिवरायांनी निर्माण केलेल्या आदर्श संहिते मधील आणखी एक पैलू म्हणजे अष्टप्रधान मंडळ !
' अष्टप्रधान ' हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल. परंतु हे अष्टप्रधान कोण होते, त्यांचे अधिकार काय होते याची माहिती पुढीलप्रमाणे-
१) मुख्यप्रधान अर्थात पेशवे :-
राजानंतर अधिकाराने सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे पेशवे. राजाच्या गैरहजेरीत सर्व कारभार प्रधान सांभाळीत असत.राज्याची एकंदर व्यवस्था सुरळीत आहे कि नाही हे पाहणे तसेच वेळ आल्यास युद्धात नेतृत्व करणे, सैन्य घेऊन नवीन प्रदेश जिंकणे अशी विविध कामे प्रधानांकडे असत.खलीत्यांवर, पत्रांवर राजाच्या शिक्क्यानंतर पेशव्यांचे शिक्कामोर्तब होई. मोरोपंत पिंगळे हे पहिले पेशवे होते.
२) अमात्य :- आजच्या भाषेत अमात्य म्हणजे अर्थमंत्री किंवा finance minister. राज्यातील एकंदर जमाखर्चांवर अमात्यांचे नियंत्रण असे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते.
३) सेनापती उर्फ सरनौबत :- संपूर्ण लष्करावर सेनापतीचे नियंत्रण असे. लष्कराचा कारभार, सैनिकांचे वेतन, युद्धात जे पराक्रम गाजवतील त्यांचा छत्रपतींच्या हस्ते सत्कार, युद्ध प्रसंगी नेतृत्व इ. कामे सेनापतींच्या अधिकारात असत. लष्कराचे घोडदळ आणि पायदळ असे दोन मुख्य प्रकार होते. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. यांचे मूळ नाव 'हंसाजी मोहिते'. ' हंबीरराव' हि महाराजांनी त्यांस दिलेली पदवी आहे.
४) सचिव :- सचिव म्हणजे सेक्रेटरी. सरकारी दफ्तरावर सचिवाची देखरेख असे.सर्व पत्रव्यवहार सचिवाच्या खात्याकडून होत असे. अण्णाजी दत्तो हे सचिव होते.
५) मंत्री :- राजाचे आमंत्रित पाहुणे तसेच भेटीस येणारे लोक यांचे स्वागत करणे, बारा महाल, अठरा कारखाने यांचा बंदोबस्त ठेवणे, राजांच्या दिनचर्येची नोंद ठेवणे इ. मंत्र्याची कामे असत.राजाची राजकीय बाजू सांभाळणे तसेच खासगी सल्लागार म्हणून मंत्र्याची नियुक्ती असे.दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री होते.
६) सुमंत किंवा डबीर :- सुमंत म्हणजेच सोप्या भाषेत परराष्ट्र व्यवहार मंत्री किंवा external affairs minister.परराष्ट्र संबंधित सर्व व्यवहार सुमंत पाहत असत. परराष्ट्र राजकारण पाहणे,अन्य राज्यांमधून येणाऱ्या वकिलांची बडदास्त ठेवणे,परराष्ट्राशी होणारा पत्रव्यवहार सांभाळणे ही मुख्यतः सुमान्ताची कामे होत.रामचंद्र त्रिंबक हे सुमंत होते.
७) न्यायाधीश :- न्यायाधीश या शब्दातूनच याचे अधिकार स्पष्ट होतात. निराजी रावजी हे न्यायाधीश होते.
८) पंडितराव :- धार्मिक बाजू सांभाळण्याचे काम पंडितराव किंवा न्यायशास्त्री कडे असे.मोरेश्वर हे न्यायशास्त्री होते.
शिवरायांच्या याच अष्टप्रधान मंडळाच्या धर्तीवर भारतीय राजकारणातील मंत्रीमंडळाची रचना केली आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी केलेली कृती आजही व भविष्यकाळातही मार्गदर्शक म्हणून ठरणार आहेत.

No comments:

Post a Comment