Friday 2 January 2015

यशाचा मूलमंत्र

यशाचा मूलमंत्र
आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला हवे, जीवनाला सकारात्मक वळण द्यायला हवे.
"मेहनत" हाच मानवाचा खरा अलंकार आहे हे सत्यात उतरवा, मानवाच्या चारित्र्याला आकार देणारा कुंभार म्हणजे "मेहनत" आहे.
“मेहनतीला हुशारीची गरज नसते” हेच एकमेव समीकरण आहे जीवनात यशस्वी होण्याचं. पण आज, आम्ही जिवंत हाडा मासाची माणसं, सक्षम माणसं, हात पायाने कणखर असलेली माणसं, परीस्थितीशी हरतो आहे, हि किती मोठी शोकांतिका आहे. जणू आमच्यातून मेहनत हा शब्दच हरवला आहे असली अवस्था घेऊन आम्ही समाजात वावरत आहोत. सदैव नशीब आणि जोतीश्याच्या भाकितावर स्वतःच्या आयुष्याची उंची पाहणारे आम्ही काय मेहनत करणार. “नशीब“ ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे आपणच आपली मेहनतीपासून केलेली सुटका होय, अपयश आल्यावर आपणच आपल्या मनाची केलेली समजूत म्हणजे नशीब.
नशिबाची खरी व्याख्या म्हणजे,
एखादा माणूस, दिन रात कष्ट करतो, मेहनत करतो, अनेक संकटाना तोंड देतो, परीस्थितीशी लढा देतो, झोप विसरतो, सुखं त्यागतो, अनेक दुखं झेलतो आणि जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा लोक म्हणतात, खरचं “नशिबवान” आहे तो. पण त्याच्या यशाच्या मागे हि सारी मेहनत त्याने घेतलेली असते हे मात्र आम्ही विसरतो आणि फक्त म्हणत असतो नशीबवान आहे तो.
हि आहे नशीबाची खरी व्याख्या.
आम्ही केलेली नशिबाची व्याख्या म्हणजे,
आम्ही मेहनतीला बगल देऊन यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतो आणि त्यात अपयश पदरी आले कि, आमच्यात नशीब ह्या शब्दाचा जन्म होतो आणि आम्ही म्हणतो कि माझ्या नशिबातच नव्हते ते.
हि आहे आम्ही केलेली नशीबाची व्याख्या.
माणूस कर्तव्याने मोठा होत असतो वयाने नाही. हात नसलेले, पाय नसलेले, शारीरिक अपंगत्व असलेले जिद्दी, मेहनती व्यक्ती पाहिले कि, मनात प्रश्न येतो कि, आपल्याजवळ सक्षम शरीर असतांना सुद्धा आम्ही जीवनात यशस्वी होण्याकरिता कुठे कमी पडतो आहे ते.
का आम्ही यशाची उंची गाठू शकत नाही...??
आपल्याला काय कमी दिलंय निर्मात्याने.
निर्मात्याने आम्हाला डोकं दिलय सुपीक विचारांचा संग्रह करण्यासाठी आणि बुद्धीच्या जोरावर जीवनात यशस्वी होण्यासाठी. पण आम्ही डोक्याचा वापर हा फक्त त्यावर असलेल्या केसांचा भांग (Hair style) पाडण्याकरिता करत आहोत आणि बुद्धिमत्तेला विसरून नशीबावर आशा ठेवत आहोत.
निर्मात्याने आम्हाला मुख दिलय ते सुंदर वाणीकरिता. पण आम्ही मुखाचा वापर शिव्यांचा साठा करण्याकरिता आणि याची अडवा त्याची जिरवा ह्या दहा कलमी उद्योगासाठी करत आहोत.
निर्मात्याने आम्हाला कणखर हात (बाहू) दिलेय ते आपल्या हाताने मेहनत करून जीवनात आपले स्थान निर्माण कण्यासाठी, आपल्या हातून सुंदर कार्य घडण्यासाठी आणि परमार्थ करण्यासाठी. पण आम्ही हाताचा वापर दारूचा प्याला धरण्यासाठी करत आहोत, आई बापाने कमावलेला घामाचा पैसा ह्याच हाताने सिगारेट च्या धुव्यात विलीन करत आहोत.
निर्मात्याने आम्हाला पाय दिलेय ते जीवनात यशाचे अंतर गाठायला, धावत्या युगात धावायला. पण आज आमचे पाय धावायला कधीच विसरले आहेत, तर ते कुठून यशाच्या मार्गावर धावतील, इतकी दयनीय परीस्थिती झाली आहे आमची.
जिद्द आणि मेहनत यांचा संगम घडून आला कि, जगातल्या सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात.
आम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा आई वडीलांनी आमचा हट्ट पूर्ण केला नाही तर आम्ही नाराज होतो आणि त्याचं दुखं करतो. पण शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती जन्मताच शरीराचा अवयव हरवलेल्या असतात, तर त्यांच्या इतके दुखं कुणाचे असावे..??
पण ते परीस्थितीशी हरत नाही तर लढत राहतात आणि जिद्द ठेऊन व मेहनत करून आयुष्याला आकार देत असतात.
पुन्हा सांगतो,
मेहनतीला हुशारीची गरज नसते हेच एकमेव समीकरण आहे जीवनात यशस्वी होण्याचं.

No comments:

Post a Comment