Monday 12 January 2015

घरात चांगले संस्कार व्हावे

घरात चांगले संस्कार व्हावे असे मी वारंवार सांगत असतो कारण जिवनात तेच सगळ्यात महत्वाचे असते. स्वराज्य हे एका दिवसात तयार झाले नाही.शहाजी राजांनी कित्येक दिवस उराशी स्वप्न बाळगले ते साकार होण्यासाठी शिवाजी राजांना तसे घडवले.उदा:बार मावळ एकत्र करणारे कान्होजी जेधे,शिवरायांचे गुरु बाजी पासलकर आदी शहाजी राजांच्या सेवेत असणारी मंडळी त्यांनी शिवबाच्या दिमतीस पुण्यास धाडुन दिली.
तोरणा किल्ल्यावर धनाचे सात हंडे सापडले ही कथा आपण ऐकतो.पण हे हंडे सापडणे हा योगायोग न्हवता.सोनाजी डबीर यांच्या मार्फ़त शहाजी राजांनी खेळलेले ते राजकारण होते.पुढे शिवछत्रपतिंनी संभाजी राजांना घडवताना योग्य ते संस्कार केले म्हणुन एका सिंहाच्या पोटी छावा तयार झाला. आग्र्याहुन सुटकेची ब्लु प्रिंट संभाजी राजांनी तयार केली वयाच्या नवव्या वर्षी. असे मानन्यास पुरावे आहेत कारण शिवाजी राजे महालातुन बाहेर जाऊ शकत न्हवते जाउ शकत होता तो छोटा संभाजी.या छोट्या संभाजीने कुठुन कसे जायचे,कुठल्या दिशेला जायचे याचा आराखडा राजांना सादर केला.
शिवाजी राजांना दुभाष्याची गरज पडत असे परंतु संभाजी राजे १६ भाषा बोलत असत.त्याकाळातील इंग्रज गवर्नर यामुळे आश्चर्य चकित झाले तसे त्यांनी आपल्या डायरित नमुद करुन ठेवले आहे.संभाजी राजांना कलेतसुद्धा फ़ार रस होता,भरतनाट्यम, कथकली आदी त्याकाळात लोप पावु शकणाऱ्या कलांना नवसंजिवनी दिली ती संभाजी राजांनी,तत्कालि न स्वराज्य बेंगरुळु आदीपर्यंत होते हे लक्षात घ्यावे.
शिवछत्रपतिंनी त्या त्या कलेतील जाणकार मंडळींकडुन संभाजी राजांना ज्ञान मिळण्याची व्यवस्था केली.
जगातिल पहिले बुलेटप्रुफ़ जॅकेट संभाजी राजांनी त्रीचीनापल्लीचा चीक्क्देव राजाचा किल्ला घेताना तयार केले.कातड्यापास ुन तयार केलेल्या चिलखतावर तेल चोपडले ज्यामुळे शत्रु सैन्याच्या बाणांचा मारा निष्फ़ळ ठरला.ही युद्धकला,राजकार ण संभाजीराजांनी"बुधभुषणम"या ग्रंथात वयाच्या १४ वर्षी लिहिली.
काशीचे धर्ममार्तंड"गागाभट्ट"यांनी लिहिलेला"राज्याभिषेक"हा ग्रंथ १४ वर्षांच्या संभाजीला गुरु मानुन अर्पण केला.म्हणजे अखिल मराठी साम्राज्यात त्यांना अर्पण करावासा वाटलेला एकमेव पडीत संभाजी महाराज होते म्हणजे संभाजी राजांचे पांडित्य किती असेल?
पण इथे सर्व मुळ काय आहे तर शहाजी ते संभाजी वगैरे पर्यंत सर्वांनी लक्षपुर्वक धेय समोर ठेवुन घडण केली.तुम्ही तुमच्या मुलांना काय संस्कार देताय हे महत्वाचे आहे.त्यामुळे खुप सारी पैशाची डबोली तुम्ही ठेव शकाल परंतु संस्कार मात्र तुम्हालाच द्यावे लागतील ते विकत मिळणार नाहित एवढं लक्षात असु द्या.

Friday 2 January 2015

वेडात मराठे वीर दौडले सात !!!

२५ फेब्रुवारी १६७४ महाशिवरात्रीचा दिवशी घडलेला इतिहास :
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की, "बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी तोंड दाखवू नका ". त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न प्रतापरावांना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
........................................................
""दगडात दिसतील अजुन्बी तेथल्या टाचा ,
'ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा ।।'
'क्षितिजावर उठतो अजुन्बी मेघ मातीचा,
'अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात ।।'
"वेडात मराठे वीर दौडले सात !!!"
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार यांना वीरमरण आले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली.
सर सेनापती प्रतापराव गुर्जर व त्यांच्या सहा साथीदारांना मानाचा मुजरा !!!

विशाळगड

विशाळगड
शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्‍या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधे विशाळगड आहे. मलकापूरकडून अथवा आंबा गावा कडून असे दोन गाडीमार्ग गजापूर मार्गे विशाळगडाला जातात. आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावाकडून तीन तासाच्या चढाईने माचाळच्या गुहेकडून आपण विशाळगडावर पोहोचू शकतो.
सह्याद्रीच्या रांगेशी लहानशा खिंडीने जोडलेला विशाळगड समुद्र सपाटीपासून १०२१ मीटर उंचीचा आहे. या खिंडीपर्यंत गाडीरस्ता असल्यामुळे अर्ध्यातासात विशाळगडावर पोहोचता येते. विस्तृतमाथा असलेला विशाळगड सह्याद्रीच्या पाताळवेरी दर्‍यांनी वेढलेला असल्यामुळे बेलाग झालेला आहे.
विशाळगडाच्या बेलागपणाचे येथिल दर्‍याखोर्‍यांचे निबीड अरण्याचे सुरेख वर्णन फेरीस्ता या इतिहासकाराने केलेले आहे. तो म्हणजो या घाटामधील वाटा अतिशय वाकडय़ा-तिकडय़ा आहेत. याची तुलना कुरळ्या केसांशी केली तरी यांची बरोबरी होणार नाही. या पर्वतांचे देखावेही अतिशय भयंकर असून याच्या कडय़ावर आणि गुहांजवळ आल्यावर प्रत्यक्षात भुते आणि राक्षस देखील दचकतील. या रानात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही. इथे वाढलेले गवत सर्पाच्या सुळ्याप्रमाणे चिवट, तिक्ष्ण ! हवा अजगराच्या श्वासो श्वासासारखी दुर्गंधमय. इथल्या पाण्यामधे मूतिमंत मृतयूचेच वास्तव्य. वार्‍याची प्रत्येक झुळूक विषाने माखलेली अशा या वाकडय़ातिकडय़ा वाटांनी चालून मुसलमानी सैन्य अगदी भिऊन आणि थकून गेले!
विशाळगडाच्या परिसरात भटकंती केल्यास आजही याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. विशाळगडाच्या या दुर्गमतेचा वापर करुन शत्रूला नामोहरण केल्याचा एक दाखलाही इतिहासात आहे. साधारण इ.स.१४५० च्या सुमारास बहमणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलीक उत्तुजार होय त्याने प्रथम पन्हाळ्या किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलीक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलीक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलीक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलीक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. यासैन्यातील एक सरदार मलीक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.
इ.स. १६६० मधे आदिलशाही सरदार सिद्धी जैहर याने शिवरायांना पन्हाळगडावर कोंडले होते. या कोंडीतून शिवराय चतुराईने निसटले. त्याचा पाठलाग करीत सिद्धी मसूद आला. त्या सिद्धी मसूदला थोपवण्याचा महान पराक्रम बाजीप्रभु यांनी केला. महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. या आणि अशा अनेक रोमहर्षक घटनांचा साक्षीदार विशाळगडाचा किल्ला आहे.
एस.टी.च्या थांब्यापासून अध्यातासात आपण विशाळगडावर पोहोचतो. गडावर मुंढा दरवाजा, रणमंडळ मलीक रैहानचा दर्गा, अमृतेश्वर मंदिर, दगडी कुंउ, पंतप्रतिनिधीचा वाडा अशा अनेक वास्तु गडावर पहायला मिळतात.
या शिवाय छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक आणि इतिहासामधे आपल्या पराक्रमाने अजरामर झालेले वीर बाजीप्रभु आणि फुलाजी प्रभु यांच्या समाध्या आज उपेक्षीत असल्या तरी नमन करण्यायोग्य आहेत.
विशाळगड आणि त्याचा परिसर मुक्तपणे पहाण्यासाठी पुर्ण दिवसाचा वेळ हाताशी असायला हवा. येथे जेवणाची तसेच रहाण्याचीही व्यवस्था होऊ शकते.
-प्रा.नितीन बानुगडे - पाटील


स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले

>>> .स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले <<<
------------------<<>>----------------------
शहाजीराजे भोसले हे एक कर्तबगार सेनापती होती, शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेसाठी त्यांचे मोलाचे सहकार्य होते, राजदरबारी नॊक्ररी असतानाही शहाजीनी तटस्थ भुमिका घेऊन अप्रत्यक्षपणे त्यांनी स्वराज्य स्थापनेला पाठिंबा दर्शवला.शहाजी मुस्तद्दी होते.विजापुरच्या बादशहाला ते शिवबाबद्दल असे सांगत की ’पोरगा माझे ऎकत नाही तुम्ही काय तो बदोबस्त करावा’ यावरुन शहाजीची ना उत्तेजन ना विरोध अशी भुमिका दिसुन येते.
शहाजी राजाना स्व:ताचे राज्य व्हावे अशी मनापासुन ईच्छा होती परंतु तेवढी कुवत त्यांच्यात निर्माण झाली नव्हती. शहाजीच्या स्वराज्य स्थापनेची ईच्छा जिजाऊनी शिवरायांच्या रुपानी साकार केले. जिजाऊनीं लहानपणा पासुनच शिवरायांवर योग्य संस्कार करुन शिवकल्याण राजा घडविला.
मालोजीचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते.मालोजीस लवकर संतान होइना म्हणुन मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते.त्यांनी नगरचा पिरशहा शरीफ़ यांस नवस केला.व त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला २ मार्च १५९५ ला पुत्रप्राप्ती झाली त्यांचे नाव शहाजी ठेवण्यात आले.पुढे १५९७ला दुसरा मुलगा झाला त्याचे नाव शरीफ़जी ठेवण्यात आले.मालोजी राजे व फ़लटणचे लखुजी जाधव यांच्या गाढ मॆत्री होती. त्यामुळे लखुजी जाधवांची कन्या जिजाऊ व मालोजी राजांचे पुत्र शहाजीराजे यांचा विवाह संपन्न झाला.शहाजी राजे भोसले व जाधव राव यांची कन्या जिजाबाई जा उभयांताचे लग्न इ स १६०५ मार्गशीष शुद्ध ५ शके १५२७, विस्ववासु नम संवत्सर फसली सन १०१५ या साली झाले.लग्नानंतर ५ वर्षानी मालोजी राजाचे इंदापुर नजीक रणभुमी वर देहवसान झाले.
शहाजींना तीन राण्या होत्या.जिजाबाई,तुकाबाई,नारसाबाई अशी त्यांची नावे होती.जिजाऊच्या पोटी संभाजी व शिवाजींनी जन्म घेतला.तर तुकाबाईच्या पोटी व्यंकोजीनीं जन्म घेतला.व्यंकोजीना शहाजीनी बेगलॊरच्या जहागिरीवर पाठवले तर शिवाजींना पुण्याच्या जहागिरीत ठेवले.शिवाजींच्या मोठ्या बंधुचे नाव संभाजी होते त्याला शहाजीनी स्वत:जवळ ठेवले. पुण्याच्या जहागिरीत कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये म्हणुन जिजाऊ व शिवराय यांच्या सोबत श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी राज्यकारभारासाठी पाठवले होते. व राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली. अशा प्रकारे स्वराज्य स्थापनेस अनुकुल परिस्थिती शहाजीराजानी करुन दिली।
शहाजीराजे हे शुर सेनानी होते निजामशाहीत त्यांचे फ़ार वर्चस्व होते. शहाजीराजे स्वत: राजे बनु शकत होते परंतु तेवढी प्रबळता त्यांच्यात आली नव्ह्ती ही पुढील उदाहरणावरुन दिसुन येते,जेव्हा शहाजहान आणि मंहमद अदिलशहा यांनी निजामशाही संपवली त्यावेळी शहाजीनी निजामचा वारस असलेल्या मुर्तीझाला राजे केले. अहमदनगर जिल्हातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या किल्ल्यावर ही घटना घडली.मुर्तीझाचे वय लहान असल्याने राज्यकारभाराची सर्व जबाबदारी ही शहाजी राज्यावर होती शहाजीनी तो राज्यकारभार पुढे ३ वर्षे चालवला
शहाजी हे राजकारणी पुरुष होते.विजापुरच्या पदरी असताना शहाजी राजांनी अनेक मोठमोठे विजय मिळवुन दिले.परंतु मराठा सरदारामधील हेवेदाव्यामुळे विजापुर दरबारात त्यांचा स्थांनास व प्रतिष्ठेत नेहमी चढऊतार होत असे.मुधोळच्या घोरपड्यांनी विजापुरच्या बादशहाचा गॆरसमज करुन दिला. आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले.
शहाजीराजांची दि. १६ मे, १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ। स. १६२५ ते १६२८ - आदिलशाही
इ. स. १६२८ ते १६२९ - निजामशाही
इ. स. १६३० ते १६३३ - मुघलशाही
इ.स. १६३३ ते १६३६ - निजामशाही
इ।स. १६३६ पासून पुढे - आदिलशाही
पुढे १६६१-६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,१६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शहीदे आलम भगतसिंग

२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले.
जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकानी हौतात्म पत्करले. अनेक वीर शहीद झाले.
तय सर्वानाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे.
पण तय सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणुनच त्यांना 'शहीदे आलम' असा किताब दिला जातो.
भगतसिंग यांच्यापुर्वीच्या क्रांतिकारकांना भारताचे स्वातंत्र्य हवे होते.
भगतसिंग यांना स्वातंत्र्य हवे होतेच, पण स्वातंत्र्यसमवेत भारतीय जीवनात क्रांती हवी होती.
स्वतंत्र्य भारतातील आर्थिक-सामाजिक-राजकीय रचनेचे सुस्पष्ट उद्दिष्ट त्यांनीच सशस्त्र क्रांतिकारकांना दिले.
समाजवादी स्वतंत्र्य भारताची उभारणी करण्यासाठी ते लढले.
'इन्कलाब झिंदाबाद' ही घोषणाही त्यांनीच आंदोलनाला दिली.
क्रांतिसाठी सबंध भारतातील क्रांतिकारकांना त्यांनी एकत्र केले व स्वतः अग्रभागी राहून कृती केली.
जनआंदोलनाशी सशस्त्र क्रांतीचा सांधा जुळविला.
जनआंदोलनाला महत्त्व दिले.
म्हणून सर्वार्थाने ते 'शहीदे आलम' ठरले

झेंडा

"झेंडा"
स्वराज्य उभारणीचा शहाजीराजांचा मनसुबा फसला आणि ते विजापूरच्या आदिलशाहची चाकरी करू लागले. बंगळुर हे शहाजीराजांचे जहागिरीचे ठिकाण. जिजाबाईसाहेब आणि शहाजीराजांनी बंगळुरात काही मसलत करून बालशिवबाला महाराष्ट्रात पुणे मुक्कामी पाठविण्याचे योजिले. शहाजीराजांनी बालशिवबाला आपले काही निष्ठावान सरदार, हत्ती, घोडे खजिना व 'भगवा झेंडा' दिला. बालशिवबा जिजाबाईसाहेबांसमवेत बंगळुरहून पुण्याकडे निघाला.
पुण्याच्या कसबा गणपतीला वंदन करून आई तुळजाभवानीला साक्ष ठेवून बालशिवबाने मावळच्या दर्‍याखोर्‍यात स्वराज्याचा यज्ञ पेटविला! मुरुंबदेवाचा डोंगर (राजगड), तोरणा, कोंढाणा इ. समिधा यज्ञात पडल्या... आणि अलिआदिलशहाची झोप उडाली! प्रथम त्याने कपटाने शहाजीराजांना जिंजीजवळ पकडून अटकेत टाकले आणि आपल्या फत्तेखान नावाच्या सरदाराला प्रचंड फौजेनिशी स्वराज्यावर सोडले. सुभानमंगळ ताब्यात घेऊन फत्तेखान सासवडजवळील खळद-बेलसर या गावाजवळ तळ देऊन बसला. नुकतेच मिसरूड फुटलेले शिवाजीराजे पुरंदर किल्ल्यावरून युद्धाचे डावपेच आखू लागले. महाराजांच्या हुकमावरून मावळ्यांची एक तुकडी सुभानमंगळावर तुटून पडली. सुभानमंगळ फत्ते झाला. फत्तेखानाच्या सरदारांचा दारुण पराभव झाला. सुभानमंगळवर भगवा झेंडा फडकला! स्वराज्यासाठी लढती गेलेली ही पहिली लढाई! (8 ऑगस्ट 1648)
आत्ता पाळी होती फत्तेखानाची! पुरंदरावर जमलेल्या जिवलगांना महाराजांनी अपुला मनसुबा सांगितला. फत्तेखानाला गनिमी काव्याचा इंगा दाखवायचा. सगळ्यांनी आनंदानी माना डोलवल्या. पुरंदराहून फत्तेखानाच्या छावणीच्या दिशेने बिनीच्या तुकडीने कूच केले. तिच्यामागोमाग इतरही मावळे निघाले. सगळ्यात शेवटी निघाली भगव्या झेंड्याची तुकडी. या तुकडीत एका जवान मावळ्याच्या हाती भगवा झेंडा होता. या तुकडीत तगडे पन्नास-पंचावन्न आडदांड मावळे सामील झाले होते. पुरंदराहून हे वादळ फत्तेखानाच्या छावणीच्या रोखाने खळद-बेलसरकडे घोंघावत निघाले. भगवा झेंडा वार्‍यावर फडफडत होता!
मराठ्यांच्या तुकड्या बेलसरच्या परिसरात घुसल्या आणि इशारत होताच फत्तेखानाच्या छावणीवर तुटून पडल्या! खानाचे लष्कर लढाईस सज्ज झाले. भयंकर हाणामारी सुरू झाली. आपलं बळ कमी पडतंय हे जाणून मराठ्यांची बिनीची तुकडी हळूहळू काढता पाय घेऊ लागली. झेंड्याची तुकडी मात्र माघारी फिरली नव्हती. उलट त्या मर्दांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढविला. खानाच्या सैन्याने झेंड्याच्या तुकडीला घेरले. गनिमांनी अगदी झेंड्यावरच गर्दी केली. झेंडा हेलकावू लागला. झेंडा पडला तर अब्रूच गेली. प्रत्येकजण झेंडा वाचविण्यासाठी शर्थ करू लागला. झेंडा धरलेल्या जवानाला गनिमांपैकी कोणाचा तरी इतक्या जोरात घाव बसला की तो स्वार घोड्यावरून खाली कोसळलाच. त्याच्या हातातला झेंडा निसटला. आता झेंडा जमिनीवर पडणार इतक्यात... एका तलवारबहाद्दराने झेंडा वरच्यावर पकडला. जखमीस्वाराला तशाच जलदगतीने दुसर्‍या एका घोड्यावर घेऊन झेंडा आपल्या हाती ठेवला आणि तुकडीला माघार घेण्याचा हुकूम केला. झेंडा हातात तोलीत त्या समशेरबहाद्दराने झेंड्याच्या तुकडीसह पुरंदराकडे कूच केले. झेंड्याभोवतीच्या गनिमांना कापून जमिनीवर पडणारा झेंडा हवेत वरचेवर झेलून मराठ्यांची अब्रू वाचवणार्‍या त्या समशेरबहाद्दराचे नाव होते बाजी जेधे! कान्होजी जेध्यांचा लेक!
प्रतापगड युद्धात मर्दुमकी गाजवणार्‍या कान्होजी जेंध्याचा पुत्र बाजी जेथे यास महाराजांनी त्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘सर्जेराव’ ही पदवी बहाल केली. बाजी जेध्यांचा झाला ‘बाजी सर्जेराव जेधे’! यानंतर पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात फत्तेखानाचा दारुण पराभव झाला. महाराजांची अस्मानी फत्ते झाली! बाजी पासलकर, गोदाजी जगताप, भिकाजी चोर, कावजी, बाजी जेधे अशी मंडळी या युद्धात हिरीरीने लढली! (ऑगस्ट 1648)
पुण्याहून दिवेघाटातून सासवडकडे जाताना दिवेघाट ओलांडला की खळद आणि बेलसर ही गावे लागतात.  सासवडमध्ये बाजी पासलकर व गोदाजी जगताप यांची समाधीस्थाने आहेत.

गुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज चुकीचा - अखिल भारतीय मराठा महासंघ

गुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज चुकीचा - अखिल भारतीय मराठा महासंघ
आता तरी डोळे अन मन निट उघडे ठेऊन माहिती ग्रहण करा.
गुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध जोडणे चुकीचे आहे. हा सण कृषी संस्कृतीशी संबंधित असून ‘गुढी’ हा शब्द बहुजनांच्या संस्कृतीमधील आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये व मराठी भाषेतील साहित्यामध्ये ‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या, १४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते. संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,
टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।
संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)
तसेच तुकारामांनी आपल्या अभंगातून किमान पाच वेळा गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे. कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामधी आनंद आनंद झाला आणि त्याभरात लोकांनी गुढ्या उभारल्या.
गोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥
गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥¬
संत तुकाराम महाराजांनीच आणखी एकदा म्हटलेले आहे,
रोमांच गुढियाडोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसंगें रे ॥
अ.क्र.१९२.५ ॥
गुढी पाडवा सणाबाबत काही लोकांनी समाजात चुकीचे गैरसमज पसरविले असून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी जोडला जाणारा संबंध चुकीचा असून संत तुकाराम महाराजांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजीराजांचा जन्म १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षाआधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचा हा अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहिला गेला होता. म्हणून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी काहीही संबंध नाही.
उत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय.
म्हणून गुढी पाडवा हा सण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती साजरा करावा व हिंदू संस्कृतीचे जतन करावे. गुढ्या उभारून घरावरती भगवा ध्वज लावावा व या सणाचे औचित्य साधून गारपिटग्रस्त शेतकर्यांीनासुद्धा मदत करावी, असे आवाहन मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.
श्री. राजेंद्र कोंढरे श्री. गुलाब गायकवाड
राष्ट्रीय सरचिटणीस जिल्हाध्यक्ष, पुणे
वसंत ॠतुचे आगमन, कृषिजीवनाशी निकटचा संबंध, निसर्गाबरोबरचे नाते, नवीन वर्षाचा प्रारंभ इ. कारणांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करावा, या भावनेने गुढी पाडवा साजरा करण्याची कृषी परंपरा आहे. गुढी पाडवा साजरा करणे वा न करणे, ही बाब ऐच्छिक आहे. गुढी पाडवा साजरा करू इच्छिणार्यांाना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, त्या दिवसाकडे इतर दिवसांपेक्षा वेगळा असा शुभ मुहूर्त म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गुढी भगव्या पताकेच्या वा अन्य एखाद्या स्वरुपात उभी करण्याची इच्छा असेल, ते तसे करू शकतात.
गुढीविषयी काही तपशिल ः
1) गुढी हा शब्द अस्सल देशी आहे. त्याचे मूळ संस्कृत भाषेमध्ये नाही. याचाच अर्थ हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला तत्सम वा तद्भव शब्द नाही. स्वाभाविकच, हा शब्द वैदिक परंपरेतील नसून बहुजनांच्या संस्कृतीमधील आहे. शब्द बहुजनांच्या संस्कृतीमधील असल्यामुळे त्याच्या मागची संकल्पनाही बहुजनांचीच आहे. कानडी भाषेमध्ये ‘ध्वज’ या अर्थाने ‘गुडी’ असा शब्द असून ‘राष्ट्रध्वज’ या अर्थाने ‘नाडगुडी’ असा शब्द आहे. ही गोष्ट देखील ‘गुढी’ हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला नसून मूळचा बहुजनांच्या आणि प्रामुख्याने दक्षिण भारतीय बहुजनांच्या भाषेतील आहे, हे दर्शविणारा आहे.
2) मराठी भाषेमध्ये गुढी हा शब्द सुमारे इसवी सनाच्या तेराव्या-चौदाव्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते. उदा.-
संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटले आहे ः
टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।
संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)
संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे ः
आइकैं संन्यासी तो चि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगिं ।
गुढी उभिली अनेकीं । शास्त्रांतरी ।। ज्ञानेश्वरी ६.५२ ॥
‘स्मृतिस्थळ’ हा महानुभाव साहित्यामधील ग्रंथ सुमारे १४व्या शतकात लिहिला गेला आहे. या ग्रंथात ‘गुढी’ या शब्दाची ‘गुढ्या’ आणि ‘गुढेया’ ही रूपे पुढीलप्रमाणे आली आहेत ः
१ ः आणि तुम्ही गुढ्यासरीसें यावे ः (स्मृतिस्थळ ८३)
२ ः गुढेयासरिसें बैजोबा गाडेनिसिं निगाले ः (स्मृतिस्थळ ८५)
‘शिशुपाळवध’ हा महानुभाव साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ होय. त्यामध्ये म्हटले आहे ः
घेत स्पर्शसुखाची गोडी ः श्रीकृष्ण आळिंगिला भुजादंडीं
तंव आत्मा उभितसे गुढीः रोमांचमीसें ॥ शिशुपाळवध ६० ।।
(वरील उदाहरणांतील जाड ठसा मूळचा नव्हे.)
राम आणि सीता यांचा विवाह झाल्यानंतर ते अयोध्येकडे निघाले असताना परशुराम आडवा आल्यानंतर राम आणि परशुराम यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात रामाने परशुरामाचा पाडाव केला. त्यानंतर दशरथांनी सर्व वर्हातडासह अयोध्येत प्रवेश केला. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे. ध्वज-पताका उभारल्या, म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या, असा होतो.
संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून किमान पाच वेळा गुढी / गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे.
कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला आणि त्या भरात लोकांनी गुढ्या उभारल्या, असे संत तुकारामांनी म्हटले आहे. त्यांचा यासंबंधीचा अभंग पुढीलप्रमाणे आहे ः
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ।।
बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ।।
गुढिया तोरणे । करिती कथा गाती गाणे ।। २८३९.१-४ ॥
कृष्णाने कालियावर मात केल्यानंतर त्याच्या गोपाळ मित्रांना अतिशय आनंद झाला. त्यांच्यापैकी जो चपळ होता, त्याच्या हातात गुढी देऊन त्याला कृष्णाने आनंदाची बातमी देण्यासाठी पुढे पाठविले, हे नोंदविताना तुकारामांनी म्हटले आहे,
पुढ पाठविले गोविंदें गोपाळा । देउनि चपळा हातीं गुढी |।४५५३.२।।
आनंदाची ही बातमी गोकुळात पोचल्यानंतर तेथे काय घडले, ते सांगताना तुकाराम म्हणतात,
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली गुढी हरुषें मात ॥
४५५५.१,२ ।।
त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते, ते नोंदविताना तुकाराम म्हणतात,
नेणे वर्णधमर्जी आली समोरी | अवघी च हरी आळिंगिली ॥
हरि लोकपाळ आले नगरात | सकळांसहित मायबाप ॥
पारणे तयांचे जाले एका वेळे | देखिले सावळे परब्रह्म ॥
ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती | गुढिया उभविती घरोघरीं ॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा | सडे रंग माळा चौकदारी ॥
४५५६.१-५ ॥
संत तुकारामांनीच आणखी एकदा म्हटले आहे,
रोमांचगुढिया डोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसेंगें रे ॥
अ.क्र.१९२.५ ॥
(जाड ठसा मूळचा नव्हे.)
संत तुकारामांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म इसवी सन १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षे आधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचा हा अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहिला गेला होता.
उत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय.
महाराष्ट्रातील निसर्गचक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ॠतूचे मानले जातात. शिशिर ॠतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये वसंत ॠतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात ‘चैत्र-पालवी’ असे म्हटले जाते. याचा अर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस वसंत ॠतूच्या आगमनाचा द्योतक आहे. तो चै. पालवीच्या आगमनाचा दिवस असल्यामुळे कृषिसंस्कृतीशी निगडित आहे.
इसवी सन ७८ पासून ‘शके’ या कालगणनेचा जो प्रारंभ करण्यात आला आहे, त्या कालगणनेनुसार नव्या वर्षाची सुरवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होतो.
सौर पद्धतीच्या कालगणनेनुसार वर्षाची नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने ‘शके’ या कालगणनेचाच स्वीकार केला आहे. या कालगणनेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस येतो.
गुढी पाडवा हा सण महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांतूनही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साजरा केला जातो.
या दिवशी महाराष्ट्रात गुढीची पूजा केली जाते. तिच्या गळ्यात हार घातला जातो. हे पाहता या दिवशी गुढीचा अनादर केला जात नाही, तर तिच्याविषयी आत्यंतिक आदर व्यक्त केला जातो.
गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे, हा स्त्रियांचा अनादर असण्यापेक्षा मातृसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक समाजपद्धतीमध्ये स्त्रियांना जे प्राधान्य दिले जात होते त्याचे द्योतक असल्याची शक्यता आहे.
गुढीच्या टोकावर पालथे ठेवले जाणारे भांडे हे राणीच्या मस्तकावर ठेवल्या जाणार्या मुकुटाचे प्रतीक असू शकते.
चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कडू लिंबाच्या पानांचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे करण्याची पद्धत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये आढळते. या पानांचा थोडा का होईना रस चाखण्याची वा पिण्याची प्रथा या राज्यांमध्ये आहे. या दिवशी कच्च्या कैरीचे पन्हेही बनविले जाते. याचा अर्थ कडू आणि आंबट रस अनुभवले जातात. शिवाय गोड, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात असतातच. याचा अर्थ, या दिवशी, निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चावींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख-दुःख वगैरे प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे, असे वर्षाच्या पहिल्या दिवशी सुचविण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवांमुळे घडते, असे मानता येते.